यवतमाळ : शेतातील कृषी पंपाची दुरुस्ती करून गावाबाहेरील सार्वजनिक नळाच्या पाण्याच्या टाक्याजवळ पार्टी करण्यात आली. नंतर पार्टीत सहभागी असलेल्या एकाला पाण्याने भरलेल्या टाकीत बुडवून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे १ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणाचा छडा आठ दिवसानंतर लागला असून मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. तुळशीराम आनंद आडे (वय ६०) असे मृताचे नाव आहे.
तुळशीराम सकाळी साडेदहा वाजता गावातील सार्वजनिक नळ योजनेच्या टाकीतील पाण्यात १ नोव्हेंबरला मृत अवस्थेत आढळून आला होता. घटनेच्या आठ दिवसांनंतर मृताची पत्नी शशिकला आडे (वय ५५) हिने ८ नोव्हेंबर रोजी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देत माझ्या पतीचा पाण्यात पडून मृत्यू झाला नसून गावातील तिघांनी त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केली असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून पुराव्याच्या आधारे आरोपी संजय रामचंद्र पारखी (वय ४८) प्रदीप बापूजी गेडाम (वय ३८) विजय शालिक सुरपाम (वय ३८) सर्व रा. मदनापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
सर्व आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली असून पुढील तपास ठाणेदार संजय सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर गावंडे, जमादार शंकर वारेकार करीत आहे. आरोपींनी तुळशीराम आडे याचा खून का केला, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. मारेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास करीत आहे.