Fire Pudhari
यवतमाळ

Yavatmal Sugarcane Crop Fire : शॉर्टसर्किटने पाच एकरातील ऊस जळून खाक; शेतकऱ्यावर आर्थिक संकट

सवना येथील घटना; महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा

पुढारी वृत्तसेवा

महागाव : तालुक्यात पावसाअभावी कोरड्या दुष्काळाचे सावट असतानाच शॉर्टसर्किटमुळे पाच एकरामधील ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 16) सकाळी सवना येथे घडली. या घटनेत शेतकरी शुभम निरंजन गरुड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सवना येथील गरुड यांच्या शेतात पाच एकर क्षेत्रावर ऊसाचे पीक उभे होते. बुधवारी सकाळी शेतातील विद्युत यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने उसाला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण ऊसाला कवेत घेतले. आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र तोपर्यंत पाचही एकरांवरील ऊस जळून खाक झाला.

आधीच पावसाअभावी पिके संकटात सापडली असताना उभे पीक डोळ्यादेखत जळून गेल्याने गरुड यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ऊस लागवडीसाठी केलेला खर्चही वाया गेल्याने नुकसान भरून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून, त्याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला आहे. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असतानाच शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे संकट अधिकच गडद झाले आहे. पंचनाम्याच्या आधारे शासनाने नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT