Fraud Pudhari
यवतमाळ

Yavatmal Share Market Fraud : शेअर मार्केटच्या नावाखाली ६५ लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका मेडिकल चालकाला तब्बल ६४ लाख ४५ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील गांधीनगर परिसरात २४ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी कोटक सिक्युरिटीज कंपनीच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनजीतसिंग किरपालसिंग बमरहा (५९, रा. गांधी नगर, यवतमाळ) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. मनजीतसिंग यांचे लोहारा चौक परिसरात मेडिकल स्टोअर आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी इन्स्टाग्रामवर रील पाहत असताना त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीची एक जाहिरात दिसली. त्यानंतर त्यांनी जाहिरातीमधील लिंक उघडली आणि ते 'बी २४ स्टेबल स्टॉक इलाईट' नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपवर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या मोठ्या नफ्याबाबतचे संदेश पाहून त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

भामट्यांनी त्यांना गुंतवणुकीसाठी 'न्यू क्रिप्टो' नावाचे एक बनावट ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर मनजीतसिंग यांनी आपल्या विविध बँक खात्यांतून वेळोवेळी पैसे गुंतवून काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले. अवघ्या दोन महिन्यांत त्यांना या ॲपवर चक्क १ कोटी २९ लाख रुपयांचा नफा दिसत होता. हा नफा पाहून आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

दरम्यान, ९ एप्रिल रोजी त्यांना २ कोटी १६ लाखांचे शेअर्स अलॉट झाल्याचे ॲपवर दाखवण्यात आले. मात्र, हा नफा आणि शेअर्स मिळवण्यासाठी भामट्यांनी ८६ लाख ३६ हजार रुपये आधी टॅक्स किंवा शुल्काच्या नावाखाली जमा करण्याची अट घातली. इतकी मोठी रक्कम पुन्हा मागितल्याने मनजीतसिंग यांना शंका आली आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून संबंधित कंपनीच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT