Yavatmal Accident News
यवतमाळ : मालवाहू ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार तर महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील ब्राह्मणी फाट्यावर घडली.
मालन देवराव धांडे (वय ६५) (रा.वारगाव) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर देवराव धांडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मूळचे वारगाव येथील रहिवाशी असलेले देवराव धांडे हे आता आपल्या परिवारासह वणी येथील चर्च जवळ राहतात. ते आपल्या पत्नीसह दुचाकीने वारगाव वरून वणीला येत होते.
दरम्यान, ब्राह्मणी फाट्यावरून शहराकडे जाण्यासाठी वळण घेत असताना भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसून असलेल्या मालन धांडे या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक देवराव धांडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा प्राथमिक तपास जमादार अविनाश बनकर करीत आहे.