Pusad Illegal Gas Cylinders Seized
यवतमाळ : पुसद शहरातील इंद्रप्रस्थ नगरात अवैध व्यावसायिक गॅस सिलिंडर साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल २१२ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मधुकरलाल जाट यांच्या घरी घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून व्यावसायिक वापरासाठी विक्री केली जात होती. पोलिसांनी छापा टाकून १९ किलोचे १९ आणि पाच किलोचे दोन असे एकूण २१ सिलिंडर जप्त केले.
याप्रकरणी संबंधित व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सिलिंडर जप्त करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक धीरज बांदे, शरद लोखंडे, पोलिस हवालदार मन्ना आडे, संतोष भोयर, तेजस राणे, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुशल मुंडेकर, पोलिस शिपाई सुनील पंडागळे, रवींद्र शिरभे, राजेश जाधव यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अवैध गॅस साठा अथवा विक्री आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.