यवतमाळ : गर्भवती प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिला मुबंई येथून उमरखेडच्या जंगलात आणून तिथे तिची हत्या केली. या गुन्ह्यातील आरोपीला पुसद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी शुक्रवारी जन्मठेप व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
गजानन उर्फ मिथुन पोपुलवार रा. बाळदी, ता. उमरखेड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिथुन पोपुलवार हा मुंबई येथे वास्तव्यास असताना त्याचे सुनीता यादव रा. उत्तर प्रदेश हिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले, पीडिता गरोदर झाली. याबाबत सुनीताला तिच्या घरच्यांनी विचारणा केली असता तिने मिथुनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी सुनीताला २७ नोव्हेंबर २०१७ रोजी घराबाहेर काढले. त्याच दिवशी सुनीता मिथुनच्या घरी गेली व त्याच्यामागे लग्न करण्याचा तगादा लावला.
आरोपीने सुनीता हिला गावी उमरखेड येथे जाऊन लग्न करू, असे म्हणून तिला उमरखेड तालुक्यातील कुरळी जंगलात नेले. तिथे सुनीताचा खून करून दगडाखाली मृतदेह लपवून ठेवला. त्यांनतर आरोपी सुनीताचा मोबाइल सोबत घेऊन मुंबईला निघून गेला. ६ डिसेंबर २०१७ रोजी गुराख्यास दुर्गंधी आल्यावर सुनीताच्या खुनाची घटना उघड झाली. दराटी पोलिसांनी तपास सुरू केला. यात मिथुन पोपुलवार याने खून केल्याचे पुढे आले. सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी तसे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.
सरकारी वकील अॅड. महेश काळेश्वरकर यांनी एकूण २० साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. आरोपीविरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात दराटी पोलिस ठाण्यातील सुभाष धुळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सरकारी पक्षाला सहकार्य केले.