यवतमाळ : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह हवालदारास रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.११) सापळा रचून दिग्रस येथे ही कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दिग्रस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नारायण धोंडबाजी लोंढे (वय ५४) व हवालदार दिलीप प्रल्हाद राठोड (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्याची मागणी तक्रारदाराने केली होती. त्यावर नारायण लोंढे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागितल्याबाबत तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिग्रस पोलिस ठाण्यात सापळा रचला. त्यामध्ये तक्रारदाराकडून नारायण लोंढे यांनी पोलीस ठाण्यात दोन हजार लाच स्वीकारून सहकारी हवालदार दिलीप राठोड यांना दिली. या दोन्ही आरोपीला रंगेहाथ पकडण्यात यश आले. दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके करीत आहेत.