यवतमाळ

Yavatmal news | 3.5 लाखांचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

कृषी व पोलिस प्रशासनाची कारवाई 

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभाग व पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत एचटीबीटी (प्लॅटिनम 5 जी) कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत प्रशासनाने सुमारे 20 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यवतमाळ शहरात 12 एप्रिल रोजी जीजे-09-5486 आणि अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या सापळा रचून ही वाहने अडवली. झडती दरम्यान पथकाला मोठया प्रमाणात अवैध साठा मिळून आला. यामध्ये ’प्लॅटिनम 5जी’ नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची 400 पाकिटे जप्त करण्यात आली.  जप्त केलेल्या बियाण्यांची बाजारभावानुसार किंमत तीन लाख 60 हजार रुपये आहे. दोन चारचाकी वाहने आणि तीन मोबाईल असा एकूण 20 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी कृषी अधिकारी प्रेमनाथ आडे यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संतोष ठाकरे (रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती), निखिल लंगडे (रा. आर्वी, जि. वर्धा), सतीश ठाकरे (रा. अमरावती) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आणि कृषी विकास अधिकारी लहुदास आडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, प्रवीण जाधव व सहकार्‍यांनी केली.  शेतकर्‍यांनी अनधिकृत आणि प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी करू  नये, यामुळे जमिनीचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT