Police Suspension File Photo
यवतमाळ

गुटखा तस्करांशी हातमिळवणी; तीन पोलीस शिपाई निलंबित

पोलिस अधीक्षकांनी या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : गुटखा तस्करांशी हातमिळवणी करून जप्त केलेला मुद्देमाल परस्पर विकणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुरुवारी रात्री उशिरा  तडकाफडकी निलंबित केले. लोहारा पोलीस ठाण्यातील बबलू पठाण आणि प्रशांत राठोड, तर लाडखेड पोलीस ठाण्याचे अविनाश ढोणे, अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दोन दिवसांपूर्वी नेर येथील कुख्यात गुटखा तस्कर तन्वीर याचा सुगंधित तंबाखूचा साठा लोहारा चौफुलीवर पकडण्यात आला होता. या कारवाईत लोहारा पोलीस ठाण्यात सेवारत असलेले पोलीस शिपाई पठाण आणि राठोड यांचा समावेश होता. त्यांनी लाडखेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ढोणे यालाही पाचारण केले होते. कायद्यानुसार, पकडलेला माल जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.

मात्र, या तिघांनी कर्तव्याला तिलांजली देत गुन्हेगारांशीच हातमिळवणी केली. पोलीस कर्मचाऱ्यांनी आदिलाबाद येथील एका मोठ्या गुटखा तस्कराशी संपर्क साधला. त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. जप्त केलेला सुमारे एक क्विंटल सुगंधित तंबाखू (माजा) सरकारी दप्तरी जमा करण्याऐवजी तो परस्पर विक्री करण्यात आला.  जप्तीचा बनाव रचून प्रत्यक्षात मुद्देमाल विकून पैसे खिशात घालण्याचा हा प्रताप पोलीस अधीक्षकांकपर्यंत पोहोचला. त्यांनी या गैरप्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.

अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान समोर आलेले पुरावे या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याने त्यांनी आपला अहवाल अधीक्षकांकडे सादर केला. अहवाल प्राप्त होताच, अधीक्षक चिंता यांनी तिघांनाही निलंबित करून संबंधित ठाणेदारांना गोपनीय पत्र पाठवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT