यवतमाळ : यवतमाळ तलावाजवळ पार्टी करणे एका युवकाच्या जिवावर बेतले. पार्टी आटोपल्यानंतर पोहण्याकरिता गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून करून अंत झाला. ही ह्रदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घाटंजी तालुक्यातील कोळंबी येथे घडली.
राजू पुंजाराम कोडापे (रा. कोळंबी), असे मृत युवकाचे नाव आहे. आज सोमवारी पहाटे त्या युवकाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. आठ ते दहा युवक रविवारी दुपारी कोळंबी तलावाजवळ पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी आटोपल्यानंतर काही युवक तलावातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. त्यात राजू कोडापे हा सुद्धा पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनास्थळावर उपस्थित त्याच्या चुलत भावासह इतरही मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा कुठेही थांगपत्ता लागलाच नव्हता. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तलाव परिसर गाठून शोधाशोध केली. यानंतर वडगाव जंगल पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, वडगाव जंगल ठाणेदारांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम राबविली. परंतु, अंधार झाल्यामुळे त्याचा पत्ता लागलाच नव्हता. शेवटी सोमवारी पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास राजू कोडापे याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ किशोर कोडापे याने वडगाव जंगल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.