यवतमाळ : शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळल्याने एका ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी वणी तालुक्यातील कुंभारखनी येथे घडली. सुरेखा सुधाकर चट्टे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सुरेखा चट्टे आपल्या पतीसोबत जनावरे चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. काही वेळाने त्यांचे पती सुधाकर चट्टे घरी परतले, परंतु जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुरेखा शेतातच थांबल्या होत्या. दरम्यान, वातावरणात अचानक बदल होऊन आकाशात ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. याच वेळी दुर्दैवाने त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बराच वेळ उलटूनही सुरेखा घरी न परतल्याने त्यांच्या पतीने शेताकडे धाव घेतली. तिथे त्यांना सुरेखा मृतावस्थेत आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ नातेवाईक आणि ग्रामस्थांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. वणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.