यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील देऊरवाडा येथील तांदूळ विक्रीकरिता छत्तीसगढ येथे पाठवायचा होता. मात्र, ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने चालकासोबत संगनमत करून ३० टन धान्यासह ट्रकही पसार झाला होता. या प्रकरणी ९ डिसेंबर रोजी ट्रकसह तेजबहाद्दूरनगर नारी रोड समर्थनगर बस्ती नागपूर येथून चालकाला अटक केली आहे. दिग्रस पोलिसांनी ही कारवाई केली. ट्रकमधील धान्याबाबत पोलिस आरोपी चालकाकडे आता कसून चौकशी करीत आहे.
दिग्रस पोलिस ठाण्यात ८ डिसेंबर रोजी जुबेर सलीम गारवे (४०) रा. देऊरवाडा याने फिर्याद दिली की, २९ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान देऊरवाडा येथील धान्य गोडावूनमधून तांदूळ विक्रीकरिता हरिकृष्ण राईस मिल, जि. राजनंदगाव छत्तीसगढ येथे पाठवायचा होता. त्यांनी यवतमाळ येथील लोकसेवा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या रियाज अली रऊफ अली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी (केसीजी ०४-पीएन-७७३७) या ट्रकचे चालक मानसिंग यास सदर तांदूळ नेण्यास सांगितले. मात्र, चालक तसेच इतर काहीजणांसोबत संगनमत करून नऊ लाख ५६ हजार रुपये किमतीचा ३० टन तांदळाची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केली. या प्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.