यवतमाळ : गावासाठी स्मशानभुमी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात वृद्धावर अंत्यसंस्कार केले. हा खळबळजनक प्रकार आज मंगळवारी मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथे घडला. घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोरी खुर्द येथील रामदास पुरुषोत्तम मानकर (वय 78) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री आठ वाजता निधन झाले. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. गावात अधिकृत स्मशानभूमी नसल्याने यापूर्वीही मृतांवर जंगल भागातील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार केले.
मात्र, यावेळी संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकार्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू केली होती.
स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेअभावी ग्रामस्थांना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. बोरी खुर्दमधील या घटनेने गावातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे किती दुर्लक्ष आहे, हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
गावात स्मशानभूमीची व्यवस्था होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बोरी खुर्द येथे स्मशानभूमीची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणीच अंत्यसंस्कार केले जातील, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.