File Photo
यवतमाळ

Yavatmal News : मारेगाव तालुक्यात दोन शेतकर्‍यांनी जीवन संपविले

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील पार्डी व सुर्ला या गावातील दोन अल्पभूधारक शेतकर्‍यांनी लागोपाठ गळफास लावून जीवन संपविले. या हृदयद्रावक घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पार्डी येथील कैलास चंद्रभान गाडगे (वय ५५) यांनी मंगळवारी २१ एप्रिलला सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. कपाशी पिकाचे अवशेष जाळण्याच्या निमित्ताने शेतात गेलेल्या गाडगे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.

याच दिवशी सुर्ला येथील विलास हरिचंद्र मेश्राम (वय ५१) हे रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता आज बुधवारी त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांच्या नावावर पाच एकर शेती असून त्याच शेतीच्या भरवशावर ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. या दोन्ही घटनांमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून घरचा कर्ता पुरुष गमावल्याने त्यांचे भवितव्य अंधारात ढकलले गे ले आहे.

मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. पिकांचे उत्पन्न घटल्याने आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. कर्जबाजारीपणा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. या घटनांमुळे संताप व्यक्त होत असून शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT