यवतमाळ : वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी शेताभोवती लावलेल्या कुंपणातील तारांमधील विद्युत प्रवाहाचा शॉक लागून एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घाटंजी तालुक्यातील दत्तापूर शेतशिवारात घडली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
करण अरुण टेकाम (वय १९, रा. दुधाना) असे मृताचे नाव आहे. करण रोजमजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सोमवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर मित्र मंगेश आत्राम आणि विकास आत्राम यांच्यासह तो शिकारीसाठी दत्तापूर शेतशिवारात गेला.
रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास गावातील अजित टेकाम यांनी करणचा शेतात विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच वडील अरुण भिमराव टेकाम यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा करण शेतात मृतावस्थेत पडलेला दिसून आला. त्याच्या डाव्या पायाला विद्युत प्रवाह वाहणारी तार चिकटलेली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दत्तापूर शेतशिवारातील शेतमालक मारोती फकरू वेट्टी (रा. लव्हाना) यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या तिन्ही बाजूंनी तारेचे कुंपण उभारले होते. या कुंपणातील विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेचा स्पर्श झाल्याने करणचा जागीच मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.