यवतमाळ

Yavatmal News : वेतनासाठी वनमजुराने संपविले जीवन, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : सामाजिक वनीकरण विभागात सलग ३० वर्षे कंत्राटी तत्त्वावर काम करूनही हक्काचे वेतन न मिळाल्याने विषप्राशन केलेल्या रमाशंकर शुक्ला या वनमजुराचा आज, सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला (किंवा रमाशंकर शुक्ला यांचे... निधन झाले). या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत कुटुंबीयांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठून तिथेच मृतदेह ठेवल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.

पुसद येथील वनमजूर रमाशंकर शुक्ला यांनी स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रलंबित वेतनासाठी प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा दिला. न्यायालयाने त्यांच्या बाजूने कौल देऊनही प्रशासकीय लालफितशाहीमुळे त्यांना न्याय मिळाला नाही. उलट, कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करून त्यांची अडवणूक करण्यात आली.

या मानसिक जाचाला कंटाळून चार दिवसांपूर्वी शुक्ला यांनी यवतमाळच्या एका लॉजमध्ये विष प्राशन केले होते. आज, सोमवारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने नातेवाईकांशी चर्चा केली.

वनमजुरांना सेवेत कायम करणे आणि प्रलंबित मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर तणाव निवळला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून यवतमाळ पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

'सुसाइड नोट'मध्ये अधिकाऱ्यांची नावे?

रमाशंकर शुक्ला यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा त्यांच्या मुलीने केला आहे. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी मृत शुक्ला यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT