यवतमाळ

Yavatmal News : पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करताना वन विभागाचा थरार; बेशुद्धीचे इंजेक्शन नागरिकालाच लागले

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भवानी गावात बुधवारी (दि. १८) एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गावात दहशत माजवणाऱ्या एका पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने झाडलेले इंजेक्शन माकडाला न लागता थेट बघ्यांच्या गर्दीतील एका व्यक्तीला लागले. या अनपेक्षित गोंधळामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

माकडाचा गावात धुमाकूळ

विदर्भातील वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे तहाणेने व्याकुळ झालेले वन्यप्राणी पाण्याचा शोध घेत मानवी वस्तीकडे वळत आहेत. उमरखेड जवळील भवानी गावात गेल्या काही दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला होता. या माकडाने गावातील अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. विशेषतः लल्ला शंकर पवार या १० वर्षीय बालकावर माकडाने जीवघेणा हल्ला केल्याने त्याच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर इजा झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते.

रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान झाला गोंधळ

गावकऱ्यांच्या वाढत्या मागणीनंतर वन विभागाचे रेस्क्यू पथक गावात दाखल झाले. या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद करण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे आवश्यक होते. त्यानुसार पथकातील नेमबाजाने माकडावर लक्ष केंद्रित करून आपल्या गनमधून बेशुद्धीचे इंजेक्शन सोडले. मात्र, नेम चुकला आणि ते इंजेक्शन माकडाला लागण्याऐवजी तिथे जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीतील सदानंद खराटे यांना जाऊन लागले.

नागरिकांमध्ये संतापाची लाट

बेशुद्धीचे इंजेक्शन लागल्याने सदानंद खराटे जखमी झाले असून त्यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो, याकडे वैद्यकीय पथकाचे लक्ष आहे. मात्र, अत्यंत संवेदनशील अशा रेस्क्यू मोहिमेत वन विभागाकडून झालेली ही चूक गावकऱ्यांच्या संतापाचे कारण ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT