Road Accident News File Photo
यवतमाळ

Yavatmal News : अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला! वळणावर क्रुझर कालव्यात कोसळली; ५ प्रवासी जखमी, एक गंभीर

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : अंत्यसंस्काराच्या दु:खात बुडालेल्या एका कुटुंबावर प्रवासादरम्यान भीषण अपघाताचा प्रसंग ओढवला. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथून महागाव तालुक्यातील वाकोडीकडे जात असताना, पुसद-माहूर मार्गावरील वेणी फाट्याजवळ भाविकांचे वाहन (क्रुझर) उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी (५ जानेवारी) घडली.

भरधाव वाहन कालव्यात कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर जैन येथील काही पुरुष आणि महिला एमएच ३७ जी ७३६९ क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने अंत्यविधीसाठी वाकोडीकडे निघाले होते. पुसद-माहूर मार्गावर असलेल्या वेणी फाट्याजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील वाहन थेट जवळच असलेल्या कालव्यात पलटी झाले. अपघाताच्या वेळी वाहनात एकूण १२ प्रवासी होते.

ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

अपघात घडताच मोठा आवाज झाला, ज्यामुळे गुंज येथील स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी जिवाची पर्वा न करता कालव्यात उतरून जखमींना वाहनाबाहेर काढले. १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधला असता, रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याचे पाहून नागरिकांनी वेळ न घालवता खासगी वाहनांची सोय केली आणि जखमींना उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात रवाना केले.

आरोग्य सेवेचा विलंब आणि पोलिसांची धाव

घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT