यवतमाळ

Yavatmal News : यवतमाळ हादरले! १० वर्षांपूर्वीचे प्रेम अन् सोशल मीडियावरील संपर्क; शेतशिवारात प्रेमीयुगुलाने संपविले जीवन

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील मानोली येथील शेतशिवारात सोमवारी एका विवाहित महिला आणि तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दोघांनी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान दोघांमधील १० वर्षांपूर्वीची ओळख आणि अलीकडेच सोशल मीडियातून पुन्हा झालेला संपर्क समोर आला आहे.

मृतांमध्ये मानोली येथील गणेश नामदेव ढोले (वय ३६) आणि राजस्थानमधील रामपूरा येथील अंजली जोगेंद्र मीना (वय ३२) यांचा समावेश आहे. गणेश हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तर अंजलीचाही विवाह झालेला असून तिलाही दोन अपत्ये आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १० वर्षांपूर्वी अंजली कामानिमित्त मानोली येथे आली होती. त्यावेळी तिची गणेश ढोले याच्याशी ओळख झाली व पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. काही काळानंतर अंजली राजस्थानला परत गेली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह लावून दिला. दरम्यान, गणेशचाही विवाह झाला आणि दोघेही आपापल्या संसारात रमले.

मात्र, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये पुन्हा संपर्क झाला. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी अंजली मानोली येथे आली होती. ती आल्यामुळे गणेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर गणेश आणि अंजली हे दोघे गावालगतच्या शेतशिवारात गेले व तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले.

घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तरीय तपासणी अहवाल आणि सखोल तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील वस्तुस्थिती समोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT