यवतमाळ : कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील बालकाचा मृत्यू खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी दिले आहे.
पिंपळखुटी येथील ६ वर्षीय शिवम सागर गुरुनुले हा बालक यवतमाळातील तारक बालरूग्णालयात ताप, खोकला व उलटीसाठी बाह्य रूग्ण म्हणून उपचार घेत असताना दि. ७ ऑक्टोबर रोजी त्याच्या घरी जेवण करताना कोसळला. त्याला तारक रूग्णालयात नेले असता त्यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री. वसंतराव नाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला असता रुग्णाच्या श्वसननलिकेमध्ये शेंगदाण्याच्या सालीसोबत जेवणाचे अंश आढळले. पुढील तपासणीसाठी अवयव व व्हिसेरा राखून ठेवला आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांना माहिती देण्यात आली असून, त्यांनी संबंधित फार्मसीकडून औषधांचे नमुने ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे.
डॉ. सारंग तारक यांनी अहवालानुसार, रूग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण अन्नाचे अंश श्वसन नलिकेत गेल्याने झाल्याचे म्हटले आहे. मृत्यू खोकल्याच्या औषधीमुळे झाल्याचे वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक नोंदही तशीच आहे. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या प्रकरणावर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती डॉ. अजय केशवाणी (बालरोग विभाग प्रमुख), डॉ. जयदेव बोरकर (शवविच्छेदन अधिकारी) यांनी दिली आहे.