यवतमाळ : जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्र.१ येथील शाखा अभियंत्याला दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली.
मधुसूदन ताजने असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांना पार्किंग शेडचे बांधकाम करणे व पार्किंग व्यवस्था करणे, अशी दोन कामे ऑनलाइन निविदेद्वारे मिळाली होती.
शाखा अभियंत्याने दोन्ही कामांचे बाकी असलेले अंतिम देयक आणि दोन्ही कामांच्या मोजमाप पुस्तिकेवर सही करून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (सिसी) देण्यासाठी ठेकेदाराकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली.
त्यामुळे याप्रकरणी एसीबीकडे तक्रार देण्यात आली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली, तसेच आरोपीने लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याने बुधवार १५ जुलै रोजी सायंकाळी सापळा रचला. दहा हजारांची लाच घेताना शाखा अभियंत्याला रंगेहाथ पकडले. यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.