यवतमाळ : बाजारात विक्रीस येणारी फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यात कृत्रिम रसायनांचा वाढता वापर व्यापार्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. फळे कृत्रिमरित्या पिकविणे, गोडी वाढविणे, आकर्षक रंग आणणे तसेच माल दीर्घकाळ टिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणार्या व्यापार्यांविरोधात कारवाईचे आदेश पणन विभागाने दिले आहेत. दोषी आढळणार्यांचे थेट परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक व्यापारी आणि जिल्हा उपनिबंधकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आहेत. बाजार क्षेत्रात नियमित तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, फळे व भाजीपाल्यात भेसळयुक्त रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या बाजारात केमिकलच्या साहाय्याने आंबा, केळी, पपई यांसारखी फळे कृत्रिमरित्या पिकवली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही व्यापारी अधिक नफा मिळवण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करत असल्याचे चित्र आहे. फळांना आकर्षक रंग आणण्यासाठी आणि ताजी दिसण्यासाठी विविध घातक रसायनांचा वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी बाजार समित्यांना कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. दोषी व्यापार्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही खळबळ उडाली असून अनेक व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणार्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळात बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याने भेसळखोर व्यापार्यांचे धाबे दणाणले आहेत.