यवतमाळ

Yavatmal Illegal fertilizer stock seized : मुदतबाह्य कीटकनाशक, खत साठ्यावर धाड; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

कृषी विभाग आणि पोलिसांच्या पथकाने सापळा रचून यश शिवनवार याच्या घरावर छापा टाकला

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे एका व्यक्तीच्या घरावर मंगळवारी कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकली. यावेळी मुदतबाह्य कीटकनाशक, रासायनिक खते आणि जैवउत्तेजक, असे मिळून 17 लाख 82 हजार 135 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात मध्यरात्री दिलेल्या तक्रारीवरून यश गजानन शिवनवार याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख गावात विनापरवानगी एका व्यक्तीने कीटकनाशक, खते तसेच जैव उत्तेजक साठवून ठेवल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कृषी विभागाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. दरम्यान, मंगळवारी दुपारी कृषी विभाग आणि पोलिसांच्या पथकाने सापळा रचून यश शिवनवार याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा घरात वेगवेगळ्या कंपनीचे 385.55 किलो मुदतबाह्य कीटकनाशक अंदाजे आठ लाख 491 रुपये, एक हजार 735 किलो रासायनिक खते चार लाख 56 हजार 50 रुपये, तर जैवउत्तेजक 188. 15 किलो पाच लाख 22 हजार 594 रुपये, असे मिळून 17 लाख 82 हजार 135 रुपयांचा साठा आढळून आला.

घटनेचा पंचनामा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यानंतर पांढरकवडा पोलिस ठाण्यात पंचायत समिती कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी यश शिवनवार याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई जिल्हा परिषद कृषी विभाग तसेच पांढरकवडा पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचार्‍यांसह पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. या घटनेचा तपास पांढरकवडा ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. 

विविध कंपन्यांच्या स्टीकरचा वापर

आरोपीने स्वतःच्या घरात मुदतबाह्य कीटकनाशक ठेवले होते. त्या कीटकनाशक, खतांवर विविध कंपन्यांचे स्टीकर लावण्यात आले होते. त्यानंतर शेतकर्‍यांच्या माथी हे कीटकनाशक, खते मारण्याचा घाट आरोपीने घातला होता. कारवाईप्रसंगी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शेतकर्‍यांची फसगत होऊ शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT