Police Pudhari
यवतमाळ

Yavatmal News : विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : 'नियम सर्वांसाठी सारखेच असतात' हे दाखवून देत जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखा, पुसद यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांवरच झालेल्या या कारवाईची सध्या पुसद शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

१ ते ७ ऑक्टोबरदरम्यान पुसद शहरात विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान पुसद शहर पोलीस ठाणे, वसंतनगर पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) कार्यालयातील १५ पोलीस कर्मचारी विनाहेल्मेट दुचाकी चालवताना आढळले. या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, यापूर्वीचा वाहतूक दंड थकवणाऱ्या ऑटो रिक्षांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा ऑटो चालकांकडून थकीत दंडापोटी एकूण ३६ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पुसदचे एसडीपीओ अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक खंडाते, पोलीस हवालदार संजय मुळे, मारोती राठोड, पोलीस शिपाई शुभम गवई, हरिदास कराळे आणि किरण मोटे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT