Murder Case Pudhari
यवतमाळ

Yavatmal Murder : घरी किराणा सामान का आणले नाही? क्षुल्लक कारणावरून वडीलांचा खून; मुलासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

किरकोळ वादातून पत्नीने केला वाद, मुलाने लाकडी दांड्यांने वडीलांच्या डोक्यात केला प्रहार

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : घरी किराणा सामान का आणले नाही या किरकोळ वादातून पत्नीने वाद केला. यानंतर मुलाने लाकडी दांड्यांने वडीलांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडीलांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दरम्यान पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे घडली.

गजानन गुलाब जुमनाके रा. शितला माता देवी वार्ड, मोहदा असे मृत वडीलांचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाचे मोठे भाऊ रमेश जुमनाके यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी मृतकाची पत्नी दुर्गा गजानन जुमनाके, मुलगा अक्षय गजानन जुमनाके (वय 32) यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी गजानन जुमनाके आणि त्यांची पत्नी दुर्गा यांच्यात किराणा सामान आणण्यावरून वाद झाला.

या दरम्यान पत्नी दुर्गा हिने पतीला धमकी दिली होती. त्यानंतर त्याच रात्री मुलगा अक्षय घरी आला. पत्नी आणि मुलाने मिळून पुन्हा गजानन यांच्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली. घरातातून भांडणाचा आवाज आल्याने परिसरातील शिवा मेश्राम, मनोज मेश्राम व इतर प्रत्यक्षदर्शी तरुण तत्काळ गजानन यांच्या घरात धावले. मुलाने हातात असलेला लाकडी दांडा थेट वडील गजानन यांच्या डोक्यात मारला.

या जबर फटक्यामुळे गजानन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यानंतर पत्नी दुर्गानेही त्याच लाकडी दांड्याने जमिनीवर पडलेल्या पतीवर दोन वेळा प्रहार केले. घटनेनंतर गजानन यांना पुतण्या अक्षय, अजय जुमनाके व ग्रामस्थ रामेश्वर गायकवाड यांनी वाहनातून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच गजानन यांचा मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूनंतर रमेश जुमनाके यांनी पांढरकवडा पोलिसात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा अक्षय आणि पत्नी दुर्गा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT