यवतमाळ : अधिक मासात जावयाला मानपान देण्याची परंपरा आहे. मात्र, घाटंजी तालुक्यातील अंजी (नृ.) येथे कौटुंबिक वादाने टोक गाठले आणि चक्क सासर्याकडूनच जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. 22 मे रोजी रात्री सुमारे आठ वाजता घडली. तर आज शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोपाल पुंडलिक मुरखे (वय 29, रा. अंजी नृसिंह), असे मृत जावयाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत बांधकाम मिस्त्री म्हणून काम करीत होता. त्याने काही वर्षांपूर्वी यमुना हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. शुक्रवारी (ता. 22) रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास गोपाल आणि पत्नी यमुना यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. वादानंतर यमुना ही माहेरी गेली. काही वेळाने गोपालही तिच्या मागोमाग सासरी पोचला. मात्र, तिथे वातावरण अधिकच तापले. यावेळी सासरे शेषराव आनंदराव कुमरे तसेच अन्य व्यक्तींनी गोपालला काठी व दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
डोके, हातापायांवर तसेच शरीराच्या विविध भागांवर झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील गोपालला नातेवाइकांनी तातडीने घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे संकलित केले. मृताचा भाऊ विशाल पुंडलिक मुरखे यांच्या तक्रारीवरून सासरे शेषराव आनंदराव कुमरे यांच्यासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक मासात जावयाचा सन्मान करण्याची परंपरा असताना कौटुंबिक वादातून जावयाचाच बळी गेल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात घाटंजी पोलिस करीत आहेत.