यवतमाळ : राळेगाव तालुक्यात अल्पवयीन मुली बेपत्ता तसेच मानवी तस्करीचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. संतप्त झालेल्या विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी रविवारी (दि.१९) दुपारी राळेगाव पोलिस ठाण्यात धडक दिली. दरम्यान, हे रॅकेट चालविणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या दरम्यान संशयिताने अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याची माहिती मिळताच नगर पंचायत प्रशासनाने आज त्याच्या घरावर बुलडोझर चालविला.
गेल्या काही महिन्यात राळेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. एका ‘ऑडिओ क्लिप‘च्या आधारावर भाजप जिल्हाध्यक्षांनी आरोप केला होता. या प्रकरणाची तक्रार आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके तसेच पोलिस अधीक्षकांकडे केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून रविवारी अपर पोलिस अधीक्षकांनी राळेगाव पोलिस ठाणे गाठले. तर बेपत्ता मुली तसेच मानवी तस्कर झाल्याची चर्चा वार्यासारखी सर्वत्र पसरली.
दरम्यान, राळेगाव शहर, तालुक्यातील नागरिक, महिला, विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटना, बचत गटाच्या महिलांनी शेकडोंच्या संख्येत दुपारी राळेगाव पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात नऊ ते दहापेक्षा अधिक महिला, पुरुषांचा सहभाग असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या गुन्ह्यागारांची मोठी साखळी असून, राज्यात तसेच परराज्यात जाळे पसरल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अपर पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून नागरिकांनी केली. या प्रकरणात पोलिस काय पावले उचलतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.