यवतमाळ : मेव्हण्याने विवाहीत महिलेशी लग्न केल्यास आपली समाजात बदनामी होईल म्हणून जावाई, मामा आणि भावाने कट रचून दोन मित्रांच्या मदतीने मेव्हण्यासह त्या विवाहीत महिलेची हत्या केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली. ही धक्कादायक घटना दिग्रस तालुक्यातील ईसापूर शेत शिवारातील दत्तापुर गावाजवळील कोलूरा ते फेट्री मार्गावर दि. ७ एप्रिलला उघडकीस आली होती. या प्रकरणातील चौघांना दिग्रस पोलिसांसह एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. या हत्याकांडाची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वर्षा धनराज गिरे (वय २६ वर्ष रा. उमरी बु जि. वाशिम) आणि आकाश विलास बल्लाळ (वय २५ वर्ष रा. गोस्ता रूई जि. वाशिम) अशी मृतकांची नावे आहे. तर विजय भारत शिकारे (वय २९ ), राजेश सोनबा गोदमले (वय ३४), धर्मराज तुकाराम बोडके (वय ३०) सर्व रा. विठाळा ता. दिग्रस, विकास विलास बल्लाळ (वय २१ रा. गोस्ता रूई जि. वाशिम) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे असून विशाल शिकारे हा अद्याप फरार असून त्याच्या शोधात पोलिस पथक पुणे रवाना झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातील उमरी येथील वर्षा आणि गोस्ता रूई येथील आकाश दोघेही उसतोड कामगार असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाली. अश्यातच २८ मार्चला वर्षा ही तिचा पती आणि दोन मुलांसह उमरी गावात परत आली. दरम्यान त्याच दिवशी वर्षा ही एकटीच घर सोडून आकाश सोबत पुणे येथे निघून गेली. याबाबतची कुणकुण आकाश याचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ आणि जावाई विजय शिकारे यांना लागली. त्यावरून तिघेही पुणे निघाले. त्या ठिकाणी मामा विशाल शिकारे यांची भेट घेवून वर्षा आणि आकाश यांचा शोध सुरू केला. दरम्यान त्या दोघांचा शोध घेवून त्यांची समजूत काढून तुमचा विवाह लावून देवू, असे आश्वासन दिले.
त्यानंतर दोघांना घेवून ते ३ एप्रिलला पुसद येथे आले. त्यानंतर वर्षा आणि आकाश या दोघांना एका लॉजमध्ये रूम करून देत सर्व वाशिम जिल्ह्यातील गोस्ता या गावी निघून आले. त्यानंतर आकाश याचा भाऊ विकास बल्लाळ, जावाई विजय शिकारे आणि मामा विशाल शिकारे यांनी आपली समाजात बदनामी होवू नये, म्हणून आकाश आणि वर्षा या दोघांची हत्या करण्याचा कट रचला. दरम्यान ४ एप्रिलला आकाश आणि वर्षा दोघेही पुणे येथे जाण्याकरीता वाशिम येथे गेल्याची माहिती मिळताच त्या चौघांनी त्याची शोधमोहीम राबवून त्यांना तुमचे लग्न लावून देतो म्हणून परत समजूत काढली. त्यानंतर आकाश आणि वर्षा दोघांना रात्री ८.३० वाजताच्या सुमारास परत आणले.
त्यानंतर विजय शिकारे याने त्याचे सहकारी मित्र राजेश आणि धर्मराज या दोघांना दारू पिण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठविले तसेच दोघांची हत्या करायची असल्याचे सांगितले. दरम्यान आकाश याचा भाऊ विकास बल्लाळ, चुलत भाऊ सज्जन बल्लाळ आणि मामा विशाल शिकारे त्या ठिकाणाहून गोस्ता या गावी परत निघून गेले. त्यानंतर जावाई विजय शिकारे हा त्यांच्या पिकअप वाहनात आकाश आणि वर्षा या दोघांना घेवून विठाळा ते साकरी मार्गावरील जंगलात घेवून आला. दरम्यान त्या ठिकाणी आकाश आणि वर्षा या दोघांची लोखंडी रॉडने निघृण हत्या करण्यात आली.