यवतमाळ : किरकोळ वादातून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. गंभीर जखमी प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्णी तालुक्यातील राणी धानोरा येथे शुक्रवारी (दि.७) ही घटना उघडकीस आली.
तुळजा पिलावन (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. कोसदनी हे तिचे मुळगाव. काही वर्षांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर दोन चिमुकल्यासह ती कोसदनी येथे वास्तव्यास होती. या दरम्यान तिचे लखन पिलावन याच्यासोबत प्रेमाचे सुत जुळले. यानंतर तिने लिव्ह इन रिलेशनशिप या कायद्यानुसार सोबत राहण्याचे ठरविले. दोन मुलांना सोडून तुळजा ही आपल्या प्रियकरासोबत नागपूर जवळील बेला या गावी आपले जीवन जगत होती.
तब्बल आठ ते दहा वर्षांपासून आपण गावी गेलो नाही म्हणून दि. २७ फेब्रुवारी रोजी हे प्रेमी युगल राणी धानोरा येथे कैलास वड यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. दि. २८ फेब्रुवारीच्या रात्री जेवणादरम्यान किरकोळ वाद झाला. त्यात आरोपी लखन याने आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. यात तुळजा ही गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ व नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, गुरुवार दि. ६ मार्च रोजी उपचारादरम्यान तुळजा पिलावन हिचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मृतकाचा मुलगा प्रशांत दत्ता पिलावन (वय २१) याने आर्णी पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी लखन पिलावन यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.