यवतमाळ : महागाव तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. गेल्या पंधरवड्यात ४ चोऱ्या उघडकीस आल्यानंतर चोरट्यांनी आता महागाव शहरातील ईसाफ बँकेचे शेटर तोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना आज बुधवारी (ता.४) सकाळी उघडकीस आली आहे. चोरटे सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
महागाव शहरातील विशाल डहाळे हे बहिणीला सोडण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी डहाळे घरात शिरून हात साफ केला. दुसऱ्या दिवशी कलगाव येथील किरण उर्फ भाईराजा भोपळे यांच्या घरी धाडसी चोरी करून सोने व चांदीचे दागिने लंपास केले. उत्तमराव गावंडे यांच्या घराचे कुलुप तोडून दीड लाखांचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना पुन्हा चोरट्यांनी मध्यरात्री उमरखेड रोडवर असलेल्या ईसाफ बँकेचे शटर जॅक आणि टॉमिच्या सहाय्याने वाकवून लाखो रुपयांवर डल्ला मारला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांचा शोध घेत आहे. चोरी प्रकरणाची गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. महागाव तालुक्यात सुरु असलेल्या चोरीच्या मालिकेने व्यापारी आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.