यवतमाळ :लहान - सहान कारणावरून पत्नीस मारहाण, त्रास देवून तिला जिवानिशी ठार मारणार्या पतीस आज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा व 500 रुपये दंड ठोठावला आहे. देविदास प्रल्हाद राठोड (वय 39, रा. कुंभारकिन्ही, दारव्हा), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे
नेर तालुक्यातील पिंप्री रोडवरील शेखर मालानी यांच्या शेतातील वीटभट्टीवर आरोपी देविदास राठोड आणि सुषमा राठोड काम करीत होते. लहान, सहान कारणाहून तो तिच्याशी वाद घालत होता. अशात 27 एप्रिल 2022 ला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी देविदास याने पत्नी सुषमा हिच्या डोक्यात लोखंडी टिकासीला जोडून असलेला दांडा मारून जखमी केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळावरील साक्षीदार यांची साक्ष आणि परिस्थितीजण पुराव्याच्या आधारावर आरोपीविरोधात नेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश चौधरी यांनी तपास केला. तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष, परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरावा ग्राह्य मानून आरोपी देविदास राठोड याला जन्मठेपेची शिक्षा व 500 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले. तर तर नेर पोलिस ठाण्यातील महेंद्र भोवते यांचे सहकार्य मिळाले.