यवतमाळ : कळंब येथील जीवनदीप निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या नववीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपाली कोमटी (रा. चापर्डा) असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दीपाली ही जीवनदीप आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहून नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक बिघडली. शाळा प्रशासनाने तिला तातडीने कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
दुर्देवाने, बुधवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. एका विद्यार्थिनीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दीपालीच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असून, पोलीस आणि प्रशासन या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.