यवतमाळ : वणी शहरात अवैध नळजोडणी करणे एका परवानाधारक प्लंबरला चांगलेच अंगलट आले असून नगर परिषद प्रशासनाने त्याला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. शहरात अनेक घरामध्ये अवैध नळजोडणी घेतल्याचे अनेकदा उघड झाले आहे. मात्र, त्याचा शोध पालिका प्रशासनाकडून घेतला जात नाही.
नवीन सत्तारूढ कौन्सिलने पहिल्याच सर्वसाधारण सभेत अवैध नळजोडणी शोधून त्यांचेवर कारवाई करण्याबाबतचा विषय घेतला होता. तरी काही नगरसेवकच या बाबीला उत्तेजन देत असल्याने प्लंबर अवैधपणे नळ जोडून देण्याचे धाडस करीत आहे. दोन दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक नऊमध्ये एका घरी अवैध नळ जोडणी होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
तेव्हा प्रशासनाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता पालिकेचा परवानाधारक प्लंबर सुभाष मडावी हा एका घरी अवैधपणे नळजोडणी करून देताना आढळून आला. पालिका प्रशासनाने त्याला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रशासनाने आता अवैध नळजोडणीची शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.