यवतमाळ : अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करीत तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना महागाव तालुक्यातील उटी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेत सुमारे साडेसात तोळे सोने, चांदीचे दागिने आणि अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू नानाराव गावंडे यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला. घरातील आलमारीचे लॉकर तोडून चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, घरातील इतर वस्तूंना हात न लावता केवळ मौल्यवान दागिने आणि रोकड यांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे चोरट्यांनी घराची पूर्वमाहिती घेतली असावी, तसेच घरातील हालचालींचा अभ्यास करूनच हा डाव आखला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे उटी गावासह संपूर्ण महागाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच तीव्र झाली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणीही स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
आयपीएस हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुसदचे प्रमुख धीरज बांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल राठोड, देवानंद कायंदे, शरद लोहकरे, पोलिस जमादार गजानन एडतकर, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, वसीम शेख, चालक विवेक पारडकर व श्रीरामे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान ठसे तज्ज्ञ, श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळावरून काही ठसे हाती लागले असून त्याच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, श्वानपथकाला ठोस धागेदोरे न सापडल्याने ते रिकाम्या हाती परतले. दरम्यान, या प्रकरणी अनिकेत गावंडे यांनी महागाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.