यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने एकीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे, तर दुसरीकडे नागरिकांना दिलासा दिला आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ३९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार दोन हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, याच पावसाने जिल्ह्यातील जलसाठ्यात २० टक्के वाढ केली असून, तीन महत्त्वाचे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.
सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील आणि जंगलाजवळील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, या पावसाचा सर्वाधिक फटका पांढरकवडा (६५० हेक्टर) आणि बाभुळगाव (८३५ हेक्टर) तालुक्यांना बसला आहे. याशिवाय राळेगाव, वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यांमध्येही ५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत.
यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकीकडे शेतकरी संकटात सापडला असताना, दुसरीकडे यवतमाळ शहराची तहान भागवणारे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारा निळोना प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यानंतर आता चापडोह प्रकल्पही केवळ २४ तासांतच भरून वाहू लागला आहे. याशिवाय सायखेडा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. या पावसामुळे यवतमाळकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास निकाली निघाला आहे.
पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगरूळ कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.