यवतमाळ : संपूर्ण विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट कायम असतानाच शुक्रवारी दि. 22 मे रोजी दिग्रस शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या तीनही व्यक्तींचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला असून अंतिम कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
शहरातील नगर परिषद परिसर, विश्रामगृहाजवळ तसेच शंकर टॉकीज परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे मृतदेह आढळून आले. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मृत अवस्थेत आढळलेल्या तीनही व्यक्तींचे शरीर अत्यंत कडक झालेल्या अवस्थेत होते. त्यामुळे तीव्र उष्णता व उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन हैराण झाले आहे.
दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. दरम्यान, मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख आनंद राजू वाढवे (वय 28, रा. कळमनुरी) अशी पटली आहे. उर्वरित दोन व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याबाबत शोधमोहीम सुरू आहे. संबंधितांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून दिग्रस पोलिस पुढील तपास करीत आहेत.
एकाच दिवशी तीन मृतदेह आढळल्याने शहरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.