यवतमाळ : महागाव तालुक्यातील ईजनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शासकीय साहित्याची कोणतीही परवानगी न घेता परस्पर विक्री केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद वानखेडे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि.14) दुपारी त्यांच्या निलंबनाचा आदेश महागाव पंचायत समितीत धडकल्याने खळबळ उडाली.
जुने मोटार पंप, लोखंडी टेबल, पथदिव्यांचे लोखंडी पोल, अँगल आदी साहित्य शाळेच्या आवारात ठेवण्यात आले होते. सहायक शिक्षक असलेले प्रमोद वानखेडे यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावातील काही व्यक्तींच्या मदतीने जुने शासकीय साहित्य अंबोडा येथील भंगार व्यावसायिकाला विकल्याचे उघड झाले. रकमेचा वैयक्तिक कामासाठी वापर या विक्रीसाठी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम शाळेच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याबाबत गावकऱ्यांनी विचारणा केली असता, संबंधित मुख्याध्यापकाने धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी महागाव बीडीओ तसेच सीईओंकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात मुख्याध्यापक वानखेडे दोषी आढळल्याने अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.