यवतमाळ

Yavatmal Fraud | यवतमाळ : शेतकर्‍यांना एक कोटीचा गंडा घालणाऱ्या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा!

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शेतमाल उधारीत घेणार्‍या व्यापार्‍याने 18 ते 20 शेतकर्‍यांची तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी आज शुक्रवारी आर्णी पोलिस ठाण्यात फसवणूक करणार्‍यांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. अशोक किसनराव इंगोले, शंतनू अशोकराव इंगोले आणि प्रणव अशोकराव इंगोले सर्व रा. कोळवण, आर्णी या तिघांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. 

पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मधुकर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी विनोद पखाले यांच्यासह इतर 17 शेतकर्‍यांनी फसवणुकीबाबत पोलिसांकडे धाव घेतली होती. आरोपी अशोक इंगोले याचे बाजार समितीत अडत दुकान आहे. गेल्या बारा वर्षांपासून तो या भागातील शेतकर्‍यांकडून नियमित शेतमाल खरेदी करीत होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचा त्याच्यावर दांडगा विश्‍वास होता.

या विश्‍वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी 2024-25 या हंगामात शेतकर्‍यांकडून सोयाबीन, चणा, गहू, तूर, आणि तीळ आदी लाखो रुपयांचा शेतमाल दोन महिन्याच्या उधारीवर खरेदी केला होता. माल खरेदी करताना शेतकर्‍यांना विश्‍वास बसावा म्हणून वजनकाटा व भावाच्या पक्क्या पावत्या देण्यात आल्या होत्या. तर काही जणांना बँक खात्याचे धनादेशसुद्धा देण्यात आले होते.

प्राथमिक तक्रारींमध्ये फसवणुकीचा आकडा सुमारे 79 लाख 40 हजार रुपये असल्याचा अंदाज होता. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. तेव्हा थकीत रक्कमेचा खरा आकडा तब्बल एक कोटी एक लाख 61 हजार 309 रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आर्णी ठाणेदार संजय खंदारे स्वत: करीत आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. विशेष म्हणजे मुख्य आरोपी अशोक इंगोले याच्याविरोधात यापूर्वीही दारव्हा पोलिस ठाण्यात 20 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT