यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील पिसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकल्याचे १ फेब्रुवारीला आढळून आले. त्याअनुषंगाने वाघिणीची शोध मोहीम सुरू होती.
अमरावती वन विभागातील कार्यरत शीघ्र बचाव दलाचे अमोल गावनेर व त्यांच्या चमूने पांढरकवडा येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रणजीत नाळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.२४) सायंकाळी पाटणबोरी वनपरिक्षेत्रातील पिलखान नियतक्षेत्रात वाघिणीला यशस्वीरित्या बेशुद्ध करून तिच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला. पुढील उपचारासाठी वाघिणीला पिंजऱ्यात बंद करण्यात आले आहे. डॉ. रणजीत नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार करण्यात येत आहेत. औषधोपचार पूर्ण होताच वाघीणीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. ही मोहीम मेळघाट व्याघ्र प्रकल्प वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.