Bribe Case  Pudhari File Photo
यवतमाळ

Yavatmal Crime : वाहतूक परवान्यासाठी चार हजारांची लाच घेताना वनविभागातील कंत्राटी कर्मचारी जाळ्यात

वनपाल व वनमजुरासह तिघांविरुद्ध कारवाई; महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : वडिलोपार्जित घर पाडल्यानंतर निघालेले जुने सागवान लाकूड उमरखेड येथे वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनविभागातील कंत्राटी संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.३०) महागाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालयात करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६० वर्षीय शेतकऱ्याने २९ सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित घराचे पाडकाम केल्यानंतर त्यातून निघालेले जुने सागवान लाकूड नवीन लाकडात रूपांतरित करण्यासाठी उमरखेड येथे घेऊन जाणे आवश्यक होते. त्यासाठी वनविभागाची वाहतूक परवानगी घेण्याकरिता महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयातील कंत्राटी संगणक ऑपरेटर विनोद शंकरराव सोळुंके (वय ३८, रा. टेंभी, ता. महागाव) याने ७०० रुपये शासकीय चलन भरावे लागेल, तसेच त्याव्यतिरिक्त चार हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

तक्रारदाराने पूर्ण पैसे न दिल्यास काम होणार नाही, असे सांगून चार हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती एसीबीला देण्यात आली. त्यानंतर महागाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान कंत्राटी कर्मचारी विनोद सोळुंके याच्यासह वनपाल आनंद हरिश्चंद्र बोरेकर (वय ३८) आणि वनमजूर जयवंत सदू ढगे (वय ५५) यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.

त्यानंतर बुधवारी (दि.३०) सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान सापळा रचण्यात आला. महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालयातील संगणक कक्षात तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना विनोद सोळुंके याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या टेबलवर ठेवलेली चार हजार रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७, ७(अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. आरोपींच्या घरांची झडती घेण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती.

ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्निल निराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर यांनी काम पाहिले. पथकात पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस हवालदार अतुल मते, जयंत ब्राह्मणकर, सुधीर कांबळे, पोलीस शिपाई आकाश सहारे, भागवत पाटील, महिला पोलीस शिपाई सरिता राठोड व चापोको दिनेश सरोदे यांचा समावेश होता. अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन

भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT