यवतमाळ : संसाराची सुंदर स्वप्ने आणि मुलींच्या हसऱ्या चेहऱ्यांनी फुललेले एक कुटुंब... पण कुणाला ठाऊक होते की, गुरुवारी (दि. ३०) रात्रीचा तो प्रवास या कुटुंबाचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. दारव्हा तालुक्यातील दहिलीजवळ कुपटी नदीला आलेल्या भीषण पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या थरारक आणि भीषण प्रसंगात पती झाडाचा आधार मिळाल्याने वाचले, मात्र आपल्या डोळ्यांदेखत संपूर्ण कुटुंब डोहात बुडाल्याचे दुःख सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश नामदेव खंडारे हे आपली पत्नी माधवी खंडारे, मुलगी साची (१७ वर्षे) आणि प्राची (१२) यांच्यासह गुरुवारी एका कार्यक्रमासाठी राळेगाव येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून, नातेवाइकांना बोरीअरब येथे सोडल्यानंतर, हे कुटुंब दारव्हा मार्गे आपल्या लोणी येथील घराकडे निघाले होते.
मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास दहिली गावाजवळील कुपटी नदीच्या पुलावर त्यांची कार आली. अंधार आणि पावसाचा जोर यामुळे पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राचा अंदाज आला नाही आणि क्षणात कार पुराच्या वेढ्यात सापडली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अविनाश आणि माधवी यांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत लोणी येथील आपल्या नातेवाईक आणि मित्रांना फोन लावून मदतीची याचना केली. "आम्ही पुरात अडकलोय, आम्हाला वाचवा..." हे शब्द उच्चारले जात असतानाच, पुराच्या प्रचंड आणि तीव्र प्रवाहाने कारला आपल्या पोटात ओढले. काही सेकंदांतच तो फोन कट झाला आणि संपूर्ण कुटुंबाचा संपर्क तुटला.
पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने कार वाहून जात असताना, अविनाश खंडारे यांना एका झाडाचा आधार मिळाला. मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी कसेबसे झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला आणि मदतीसाठी अंधारात हंबरडा फोडला. त्यांच्या त्या आक्रोशाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तिकडे धाव घेतली. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अत्यंत कठीण परिस्थितीत अविनाश यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि दारव्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पती-वडील वाचला, पण ज्यांच्यासाठी आयुष्य जगायचे होते, त्या तिघी मात्र निघून गेल्या होत्या. शुक्रवारी (दि. ३१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर पुराच्या पाण्यात अडकलेली कार सापडली. बचाव पथकाने जेव्हा कारची तपासणी केली, तेव्हा आतमध्ये पत्नी माधवी (४०), मुलगी साची आणि चिमुकली प्राची यांचे मृतदेह आढळून आले. हे दृश्य पाहून घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
बचाव पथकाने तीनही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कालपर्यंत ज्या घरात हसणे-खिदळणे सुरू होते, त्या खंडारे कुटुंबातील तीन सदस्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने लोणी गावासह संपूर्ण आर्णी तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.