यवतमाळ : पुसद शहरातील विहार लॉजमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या गोरखधंद्यावर शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे दोन लाख 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बनावट नोटा तयार करणार्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
विहार लॉजमधील एका खोलीत बनावट चलनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाल इंद्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मध्यरात्री सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहाथ आढळून आले.
या छाप्यात टींक्चर आयोडीन, सोडिअम थायोसल्फेट, स्पिरीट, कागद, प्रिंटरसह विविध रासायनिक साहित्य आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. पोलिसांनी घटनास्थळावरून तयार बनावट नोटा, छपाई साहित्य व इतर उपकरणांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील काही आरोपींसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुरेश किशन पेंद्राम (वय 40, रा. व्ही. बी. कॉलनी जन्नाराम), अविनाशकुमार सुरेंदर मालराज (वय 37, रा. तिलकनगर, मंचेरीयाल), व्यंकटेश किशन जंगली (वय 33, रा. जन्नाराम, मंचेरीयाल), सैय्यद साजिद सैय्यद खाजा (वय 35, रा. मंचेरीयाल) यांचा समावेश आहे. आरोपींनी शहरात कुठे आणि किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, या रॅकेटमागे आणखी कुणी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. यापूर्वीही शहर पोलिस ठाण्यांतर्गत काकडदाती व नवीन पुसद मध्ये बनावट नोटा तयार करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.