यवतमाळ : महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण शंकर राखडे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण राखडे हे रविवारी सायंकाळी काळी टेंभी ते हिवरा मार्गावर असलेल्या पुलाखालील नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, रात्र उलटूनही ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही पत्ता लागला नाही.
सोमवारी (दि. ६) सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना पुलाखालील नदीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी तातडीने महागाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा केला.
लक्ष्मण राखडे यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे राखडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.