Yavatmal crime news
यवतमाळ: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून आणि अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन भीषण हत्याकांडांमुळे कौटुंबिक हिंसाचाराचे क्रूर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांमधील आरोपी पतींना अटक केली आहे.
पहिली घटना यवतमाळ तालुक्यातील रुई शिवारात घडली. येथील एका शेतात रोजमजुरी करणारा राहुल डोंगरे (वय ४१) हा पत्नी मंदा हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असत. बुधवारी (दि. ६) दुपारी याच वादातून राहुलने संतापाच्या भरात पत्नी मंदाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत पत्नीला घरातच सोडून त्याने बाहेरून दार लावले आणि पळ काढला.
शाळेतून घरी परतलेल्या मुलीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गंभीर जखमी मंदाला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारेकरी पती राहुल डोंगरे याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील चौसाळा मार्गावरील बोदड येथे घडली. चंद्रशेखर उर्फ चंदू ठक (वय ३०) हा पत्नी दिव्यानी (वय २७) हिच्यावर अनैतिक संबंधांचा संशय घेत होता. यावरून झालेल्या भांडणानंतर दिव्यानी तिच्या भावाकडे राहायला गेली होती. गुरुवारी चंद्रशेखर मुलाला भेटण्याच्या बहाण्याने तिथे पोहोचला. तेथे पुन्हा पती-पत्नीत वाद विकोपाला गेला आणि चंद्रशेखरने रागाच्या भरात चाकूने दिव्यानीच्या छातीवर आणि गळ्यावर वार करून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पती चंद्रशेखर ठक याला ताब्यात घेतले.
एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.