Crime News pudhari photo
यवतमाळ

Yavatmal Crime | यवतमाळ जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत दीड लाखांची धाडसी चोरी!

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत ग्राहकांची वर्दळ असतानाच चोरट्याने थेट कॅश काउंटरवरूनच दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे बँक प्रशासन आणि ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ओम कॉलनी येथील रहिवासी ज्योती रामकृष्ण घोटेकर (वय 51) या बँकेत व्यवहार करण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, बँकेच्या कॅश काउंटरवर दीड लाख रुपयांची रोकड ठेवलेली असताना, अचानक एका चोरट्याची नजर या रकमेवर पडली. गर्दी आणि सुरक्षेत असलेली किंचितशी ढिलाई हेरून आरोपीने काही क्षणांत ती रोकड गायब केली.  काही वेळातच कॅश काउंटरवरून रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच बँकेत मोठी धावपळ झाली.

घोटेकर यांनी तत्काळ अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी चेतन शालीकराम मांडवगळे (वय 30) रा. देवीनगर लोहारा, दारव्हा रोड यवतमाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी, जिथे नेहमीच सुरक्षारक्षक तैनात असतात, तिथल्या थेट कॅश काउंटरवरूनच दीड लाखांची रोकड चोरीला जाणे, यावरून बँकेतील सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT