उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी(दि,११) उमरखेड व महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या मतदानात दोन्ही तालुका गटांत शंभर टक्के मतदान झाले. उमरखेड तालुका गटातील ५२ आणि महागाव तालुका गटातील २८ अशा एकूण ८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे, जिल्हा गटासाठी सुमारे ८० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तालुका गटांतील लढतींमध्ये चुरस दिसून आली, तर जिल्हा गटात काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा मतदानानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उमरखेडमध्ये अखेरपर्यंत चुरस
उमरखेड तालुका गटात बळीराजा सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राम देवसरकर यांच्यात थेट लढत झाली. एकूण ५२ मतदार असलेल्या या गटात मतदानाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी आपापल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यावर भर दिला.
सकाळच्या सत्रात राम देवसरकर यांच्या समर्थकांनी २२ मतदारांचे मतदान करून घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यानंतर प्रकाश पाटील देवसरकर यांच्या समर्थकांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या बाजूनेही सुमारे २८ मतदारांचे मतदान झाल्याची चर्चा होती. त्यामुळे दोन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व ५२ मतदारांचे मतदान पूर्ण झाले.मतदानानंतर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच या दाव्यांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
महागावमध्ये भुतडांच्या विजयाची चर्चा
महागाव तालुका गटात एकूण २८ मतदार असून, येथेही शंभर टक्के मतदान झाले. मतदानाच्या सुरुवातीला तीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर भाजपचे उमेदवार नितीन भुतडा यांच्या समर्थकांनी आपल्या बाजूच्या मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. भुतडा समर्थकांकडून २३ मतदारांचे मतदान झाल्याची चर्चा होती.
या गटात नितीन भुतडा यांची बाजू वरचढ असल्याचे मतदान केंद्राबाहेर बोलले जात होते. त्यामुळे महागाव गटात भुतडा यांचा एकतर्फी विजय होईल, असा अंदाज काही समर्थकांकडून व्यक्त करण्यात आला. मात्र, मतपेटीतून नेमका कोणता कौल बाहेर पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा गटात महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा
उमरखेड आणि महागाव या दोन्ही तालुक्यांत जिल्हा गटासाठी झालेल्या मतदानात काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला तुलनेने अनुकूल कौल मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. जिल्हा गटासाठी सुमारे ८० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या मतदानाचे प्रत्यक्ष निकाल आणि मतांचे गटवार विभाजन स्पष्ट झाल्यानंतरच कोणत्या पॅनलला किती बळ मिळाले, हे निश्चित होणार आहे.
उमरखेड तालुका गटात माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि राम देवसरकर या दोन्ही उमेदवारांनी विजयाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. मतदानाच्या दिवसभरातील घडामोडी, समर्थकांचे दावे आणि मतदानाचे आकडे यामुळे या निवडणुकीतील निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे.
मतपेटीचा चमत्कार कोणाच्या बाजूने?
दोन्ही तालुका गटांत शंभर टक्के मतदान झाल्याने मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, मतदान केंद्राबाहेर व्यक्त होणारे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील कौल यांत कितपत साम्य राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या दुपारनंतर मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उमरखेडमधील चुरशीच्या लढतीचा आणि महागावमधील भुतडा यांच्या विजयाच्या चर्चेचा निकाल लागेल. त्यामुळे मतपेटीचा चमत्कार कोणाच्या बाजूने ठरणार, याकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.