यवतमाळ

यवतमाळ : २५ एकर शेतातील आंतरपिकात गांजा शेती; स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

backup backup
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : महागाव तालुक्यातील घोणसरा आणि बरगेवाडी या दुर्गम भागातील शेतशिवारात २५ एकर क्षेत्राच्या परिसरात इतर पिकांमध्ये आंतरपीकासारखी गांजाची लागवड करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज बुधवारी पहाटे धडक देत गांजा शेतीचा पर्दाफाश केला.
देविदास ढाकरे, सुखदेव ढाकरे, वनदेव ढाकरे (सर्व रा. घोणसरा), फालसिंग राठोड (रा. मोहदी), अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गांजा लागवड करणार्‍यांची नावे आहेत. घोणसरा शेतशिवारात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. एक आठवडाभरापासून एलसीबीचे कर्मचारी माहिती घेण्यासाठी वेशांतर करून फिरत होते. ग्राहक बनून गावातील काही लोकांकडून गांजाच्या शेतीची तपशीलवार माहिती गोळा करून अहवाल पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्याकडे देण्यात आला. बुधवारी पहाटे घोणसरा-बरगेवाडीच्या शिवारात पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने यांच्यासह ५० कर्मचारी, अधिकार्‍यांचा फौजफाटा पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे, गजानन गजभारे, गणेश वनारे, विवेक देशमुख, ठाणेदार आर.के. राठोड, बालाजी शेंगेपल्लू यांच्यासह पोलिस यंत्रणेला सोबत घेऊन शेतात धडक दिली. तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्यासह पोलिस कर्मचारी चालले. प्रत्यक्ष गांजाची लागवड बघून पोलिस यंत्रणा चक्रावली. २५ एकरातील क्षेत्रात कापूस आणि सोयाबीन पिकांत अंतरपिकांप्रमाणे गांजाची लागवड करण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत १५ क्विंटलपेक्षा जास्त गांजाची झाडे कापून पोलिसांनी ताब्यात घेतली होती. अजूनही काही शेतांमध्ये गांजाची लागवड केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
SCROLL FOR NEXT