यवतमाळ : झोपेत असलेल्या युवकाचा लाकडी दांड्याने खून केला. घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा (खुर्द) येथे बुधवारी (३ डिसेंबर) पहाटे ही घटना घडली. विशाल जगन रंदई (वय ३७) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याची वृद्ध आई व भाच्याला घेऊन राहत होता. विशाल भाच्यासोबत घरासमोरच्या मोकळ्या जागेत झोपत होता. मंगळवारी (दि. २) रात्री ९ वाजता तो झोपला. त्याचा पहाटे चार वाजता मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी संशयावरून तसेच विशालच्या मोबाइलमध्ये असलेल्या कॉल रेकॉर्डवरून निलेश अरुण ढोणे (३५, रा. पांढुर्णा खुर्द) याचा शोध सुरू केला. निलेश घाटंजी शहरातील एका शेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी निलेश याला शोधून ताब्यात घेतले. निलेशने गुन्ह्याची कबुली देत, विशालवर लाकडी दांडक्याने प्रहार केल्याचे सांगितले.
याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नीलेश ढोणे याला न्यायालयात हजर केले. गुन्ह्याशी संबंधित कारवाई पूर्ण झाल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास घाटंजी ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन राठोड करीत आहेत.
पहाटे ४ वाजता विशालचा मृतदेह त्याच्या घरासमोरच आढळला. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी विशालच्या मोबाईलवरील शेवटच्या कॉलवरून आरोपीचा शोध घेतला.