यवतमाळ : साखरपुड्याचा सोहळा पार पडल्यानंतर भावी पतीनेच तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर ठरलेला हुंडा एकाच वेळी देण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी हे लग्न मोडले. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी नवरदेवासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील लोकेश राजेंद्र तोनगिरे याच्याशी यवतमाळातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने यवतमाळ शहरात साखरपुडा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी ४ लाख रुपये खर्च केले होते. लग्नासाठी ७ लाख रुपये हुंडा देण्याचेही ठरले होते.
साखरपुड्यानंतर पूजेसाठी लोकेश हा मुलीच्या घरी आला होता. घरी कोणीही नसल्याची संधी साधून लोकेशने पीडित तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. या कृत्यामुळे तरुणी मानसिक धक्क्यात असतानाच मुलाकडच्या मंडळींनी हुंड्यावरून नवा वाद उकरून काढला.
लग्नासाठी ठरलेली ७ लाख रुपयांची रक्कम एकाच वेळी द्या, तरच लग्न करू, अशी अट मुलाकडच्यांनी घातली. मुलीच्या आईने ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचा प्रस्ताव दिला, परंतु तो फेटाळून लावत लोकेशच्या कुटुंबीयांनी एकतर्फी लग्न मोडल्याचे जाहीर केले. फसवणूक आणि अत्याचार झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने न्यायासाठी पोलिसांचे द्वार ठोठावले.
पीडितेच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी मुख्य आरोपी लोकेश राजेंद्र तोनगिरे (वय २७) याच्यासह मयूर राजेंद्र तोनगिरे, सुरभी मयूर तोनगिरे, मोहिनी राजेंद्र तोनगिरे, अर्चना संदीप तोनगिरे, संदीप भाऊलाल तोनगिरे आणि मनीष जीवनालाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा आणि अत्याचाराच्या कलमान्वये हा तपास सुरू असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.