Crime Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime : भरदिवसा दुचाकीची डिक्की फोडून दीड लाखांची रोखड लंपास

पुढारी वृत्तसेवा

उमरखेड : उमरखेड शहरातील गजबजलेल्या पुसद मार्गावर मंगळवारी एका धाडसी चोरीची घटना घडली. बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आज बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आनंद नगर येथील रहिवासी अनिल रामचंद्र टाक यांनी मंगळवारी सकाळी 'बँक ऑफ महाराष्ट्र'मधून आपल्या खात्यातील दीड लाख रुपये काढले होते. ही मोठी रक्कम त्यांनी सुरक्षिततेसाठी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर ते काही वैयक्तिक कामासाठी पुसद मार्गावरील स्टेट बँकेसमोर आले.

दुचाकी उभी केल्यानंतर टाक हे मोबाईलवर बोलत काही अंतरावर गेले होते. मात्र, डिक्कीत मोठी रक्कम असल्याची जाणीव होताच ते तातडीने आपल्या दुचाकीकडे परतले. दुर्दैवाने, त्याच वेळी तीन अनोळखी इसम त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील पैसे काढताना त्यांना दिसले.

चोरट्यांचा थरारक पाठलाग

आपले पैसे चोरीला जात असल्याचे पाहून टाक यांनी आरडाओरडा करत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे आधीच तयारीत होते. दोन आरोपी एका मोटारसायकलवर, तर तिसरा आरोपी दुसऱ्या दुचाकीवर बसून माहेश्वरी चौकाच्या दिशेने अत्यंत वेगाने पसार झाले. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळ उडाला होता.

पोलिसांकडून तपास सुरू

याप्रकरणी अनिल टाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याद्वारे आरोपींचा माग काढला जात आहे. "आम्ही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत असून, लवकरच या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील," असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT